Thursday, January 16, 2014

फटका




धडधाकट हे मिळता जीवन आनंदाने जगत रहा
आयुष्याच्या वाटेवरती प्रगतीचा आलेख पहा
असेच काही अपयश येता खचुनि तुम्ही जाऊ नका
मनास दुखरया लगाम बांधुनी पुन्हा उद्याचे स्वप्न विका
देहाचे हे इंजिन तुमचे भान ठेउनी जगवत जा
बिघाड होता थोडा देखील दुरस्त त्याला करीत जा
उगाच खुसपट काढुनी तुम्ही तलवारी त्या परजू नका
मत्त हत्ती सम पायदळी त्या वाटसरूंना तुडवू नका
आसपास जे कमनशिबी जे, त्यांच्यासाठी कधी झिजा
भूतकाळच्या बेड्या तोडूनी वर्तमान तो जगि जगा
मनोरथाचे इमले बंगले, उगाच बांधत राहू नका
लेखा जोखा दिवस आजचा रोज आढावा घेत शिका
मनात रुजता काही ध्येये, स्मरणा मधुनी गाळू नका
संगोपांगी विचार करुनी पाठपुरावा सोडू नका
पालक आपुले  झिजले अविरत त्यांचे अपयश दावू नका
अस्तित्वाला कारण तुमच्या, उपकृत राहून  सदा झुका
अति मैत्री अन अति शत्रुता यास न द्यावा उगाच थारा
सहा विकारी आडव्या भिंती त्यावर तुम्ही मात करा
नाव प्रसिद्धी अहंकार हा नको  निरंतर  गाजा वाजा
निकोप स्पर्धा करा स्वतःशी हलके हलके उमलत जा
अन्न उदक जे मिळते मुबलक समाधान ते त्यात स्मरा
कष्टाची त्या जोड देउनि सार्थक या जगी तुम्ही करा
शांत करुनी मनास आपुल्या आखुनी घ्या आपुली त्रिज्जा
कान देउनि कधी जगाच्या पडसादांना पण ऐकत जा
धर्म कांड अन कर्म कांड हा भुल भूल्लैय्या असे खरा
हृदयी तुमच्या देव वसे तो त्यास मात्र तुम्ही रोज स्मरा
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment