Thursday, January 16, 2014

कसे सांगू मला कळेना

  

कसे सांगू मला  कळेना, हृदयंगम ते दृश्य हलेना
भल्या पहाटे  उद्यानी त्या, मी वेचीत फुला फुलांना       

सप्तरंग सुमने उधळी, हितगुज करिती अवघी सगळी
वृक्ष लताच्या पायाखाली, तृण पातीहि खुदकन हसली

अबोल वृक्ष असे बहरले, वेली त्यावर, हलवी झुले
हिंदोळे पक्षांचे कुजबुजले, विहंग सप्तसुरांनी बोले

चंपक,जाई,जुई नटली, निशिगंधाची स्वारी रुसली
गुलाब पुष्पे पहा डवरली, शेवंती ही सफेद, पिवळी

कुठे आडोशी मशरूम लपले, मुंग्यांना जणू पायच फुटले
कीटक घेती भिंगरी,भेंडोळे, फ़ुलपाखरू क्षण विसावले

मधमाशांनी भरले पोळे, भृंगराज गुं s गुं s परि बोले
मधुपुष्पांचे ओसंडे प्याले, कोळ्यांनी हि विणले जाळे

ताजी तवानी झुळूक आली, सळसळ पाने मनात डुलली
मृदगंधाची लहर पसरली, खोल अंतरी अलगद भिडली

कसे सांगू मला कळेना, शब्दहि थोटे अभिव्यक्त होईना
काव्यातून ते चित्र  भरेना, घ्या अनुभूती  स्वतःच  ना!
रचना: हेमंत केतकर 





 

No comments:

Post a Comment