Saturday, March 22, 2014

सांगाती

सांगाती
प्रिये वाहतो मी तुज फुलांचा झुला
मनोगुज अस्फुट  तव कळते मला

प्रपंचात पत्नी, तू भार उचली सदा
वने वादळे, अन ओलांडल्या नद्या
देवदत्त लाभे खंबीरता  तुला

पहाटे पहावी जणू उगवती आभा
हास्य सदा शिंपित तव निजप्रभा
तुझ्या अंतरी सूर्य भासे मला

तुझे शब्द कि जळी तरंग पसरे
तुझे हीतगुज, जळी मीन भासे
निस्पृहतेने तव मोहिले मला

तुझे स्थिर चित्त, धरा हि मना
अचूक तोलसी आप्त, जगजना
ही साथसंगत धीर देते मला

मज गीत सुचते प्रतिभा बहरते
गाणे असे, मन अंगणी उमलते
असे काव्य आज सादर तुला
रचना:हेमंत केतकर

Sunday, February 23, 2014

प्रेम


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, सर्वांचे मात्र ते सेम नसते
कोणी म्हणते प्रेम आंधळे असते,चलाख बुद्धीही प्रेमात फसते

कधी प्रेम असते एकतर्फी ओढ, आकर्षण आणि लैंगिक खोड
वासनेचा बाण सोडतो मेन रोड, शेवट नसतो मग सुखांत गोड

प्रेमाचा कधी होतो त्रिकोण, अन हटून बसती प्रेमाचे तिन्ही कोन
मनाचे होती कधी चौकोन, षटकोन, उमटतात मग स्मृतीत व्रण

प्रेमात नसते जेव्हा चित आणि पट, प्रेम तेव्हा होतो अनुबोध पट
प्रेमाचा शक्य असतो कसाही शेवट, कधी मधुर, तिखट वा खारट

खरे प्रेम म्हणजे पाणी निर्मळ, स्वच्छ दिसतो आतील तळ
अड्वेल जर त्यास कोणी दुष्ट खळ, बंध तोडेल उधाण जळ

प्रेमातले असते गुपित खरे, फणसातील जणू गोड गरे
मनात कबुतर गोलगोल फिरे, हीर रांझा, नि प्रेमाचे झरे 

प्रेमात पसरते ती चंद्रप्रभा, झळाळून उठते मनास आभा
नसतो मनात सावता सुभा, सच्च्या प्रेमाचा सच्चा गाभा

प्रेमात हर्ष, प्रेमाचा स्पर्श, प्रेम जगवावे जिवंत प्रवाही
खरे प्रेम जे विटत नाही, उमलते फूल असं तुटत नाही
रचना: हेमंत केतकर 



 

Saturday, February 8, 2014

मुक्ताई

मुक्ताई
जीवन मुक्त असू दे गाथा
सदगुरूचरणी झुकू दे माथा
उंच जीवाची घेई भरारी
कैलासावर शिव त्रिपुरारी

बेहोशी मायेची नसावी
सोsहम चित्ती जाण वसावी
काळ वेळ हा जीवन मेवा 
ब्रह्म खुंटीला बांधून घ्यावा

षट शत्रूंचा सहज पिंजरा
मला न व्हावा कधी निवारा
निसर्ग माता माय भवानी
भय मेघांचे व्हावे पाणी

सुजनांची ती साथ मिळावी
मन बुद्धीचीहि जोड जुळावी
आरोग्याच्या सुगम संगती
आत्म वैभवी होवो क्रांती
रचना: हेमंत केतकर 


तिन्हीसांज


सांजवेळ गेली सरुनी
एकाकी मी नदीकिनारी

उन्हे उतरली झुके सावली
सळसळली हि झाडे वेली
तांबूस किरणे जळी उतरली
आसमंत हा मिठीत घेउनि

पाकोळ्यांचे नृत्य संपले
पाखरांचे थवे विखुरले
चतुरानी प्रतिबिंब चुम्बले
शांत सावळ्या पाण्यामधुनी

थकलो डोही खडे टाकुनी
सवे स्वतःशी शीळ घालूनी
बगळ्यांची चुकली जोडी
आकाशी झळाळत मौनी

संगीत घुमत रातकिड्यांचे
अंधारातून डोह दुमडले
थंडगार थरथरते वारे
शिरशिरले  माझ्या मनातुनी

चंद्रकोर ती दूर आकाशी
मंद वात ते मज न जाणवी
गाठून अवचित मज एकांती
अंधारातून रात्र गोठली
रचना: हेमंत केतकर 


मन आणि बुद्धी


मन आणि बुद्धी
जसे पक्षी आणि वृक्ष
मन वृक्षावरी बैसे
पक्षी आनंदाने डोले
मन उडाले उडाले
बुद्धी खिन्नतेने बोले
मन उडे भिर भिर
करे बुद्धी कीर कीर
पेटे उन्हाची ती झळ
मना वृक्ष हेच स्थळ
पक्षी वृक्षाचा हा मेळ
वृक्षी पक्षाचे ते घर
सजे सुक्या फांदीवर
आला सोसाट्याचा वारा
राहे मनाला न थारा
पक्षी उडाला उडाला
वृक्ष एकटा राहिला
गेले वादळ सरुनी
पक्षी विसावे फिरुनी
पक्षी वृक्षाचा हा खेळ
मन बुद्धीचाच मेळ
रचना: हेमंत केतकर

प्रतिबिंब


तू आणि मी, मी आणि तू
कोण कसे? कोण कुठे?
मी तू वाटे, तू मी वाटे
तरी दोघे वेगळे कसे?

मोजा एका हाताचा,
दुज्या हाती बसत नाही
केवढे साम्य,प्रचंड फरक
तुला स्वर्ग मला नरक

सकाळ तशीच सायंकाळ
नजारा तोच जवळपास
दिवसहि तोच, सुर्यहि तोच
पण उदय अस्त हीच खोच

आरशात परत आपलेच रूप
तंतोतंत तरी अंतर खूप
एक खरे, एक भ्रामक
अगदी सारखे तरी उलट
भाग्य आपले उलट पालट,उलट पालट!
रचना: हेमंत केतकर 

 
 

वर्तमान


कशासाठी खोदतो बेटा
भूतकाळातील थडगी
अंधारल्या मैदानावर
झोपलेली मडकी

अर्धे आयुष्य सरले तुझे
झेपावताना पुढे पुढे
अज्ञाताची वाट सारी
तरी तुझे मन का कुढे?

स्वार्थ ज्यांना प्रिय होता
त्यांचा त्यांनी साधला
तुझा तो हेतू नव्हता मुळी
म्हणून तू निघून गेलास

एक स्मशान टाकले मागे
हपापलेल्या भूतांचे
तरी मन का गजबजते?
आठवून त्यांचे हेवे दावे

अशी स्मशाने रोज तू
सरावाने पार केली
मार्गी तुझ्या नशिबाने
गुरु शक्ती साथीस आली

ती शक्ती सांगते तुला
मी ब्रह्म आहे
तुझा अहं विसरण्यासाठी
हा मायाजाल आहे

तुझाच जीव, तुझाच देव
साऱ्या जगात भरला आहे
वेली,झाडे,माणसे,प्राणी
यात तो व्यापला आहे

भूतकाळातील हवा ती
मनात साठे, तमात दाटे
गाभाऱ्यातील ज्योतीला
तिच्यापासून धोका वाटे

म्हणून म्हणतो बेटा तुला
नको खोदू जुनाट थडगी
अंधाऱ्या हवेस आत येण्या
उघडू नको आठवणींची खिडकी
रचना: हेमंत केतकर