Sunday, February 23, 2014

प्रेम


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, सर्वांचे मात्र ते सेम नसते
कोणी म्हणते प्रेम आंधळे असते,चलाख बुद्धीही प्रेमात फसते

कधी प्रेम असते एकतर्फी ओढ, आकर्षण आणि लैंगिक खोड
वासनेचा बाण सोडतो मेन रोड, शेवट नसतो मग सुखांत गोड

प्रेमाचा कधी होतो त्रिकोण, अन हटून बसती प्रेमाचे तिन्ही कोन
मनाचे होती कधी चौकोन, षटकोन, उमटतात मग स्मृतीत व्रण

प्रेमात नसते जेव्हा चित आणि पट, प्रेम तेव्हा होतो अनुबोध पट
प्रेमाचा शक्य असतो कसाही शेवट, कधी मधुर, तिखट वा खारट

खरे प्रेम म्हणजे पाणी निर्मळ, स्वच्छ दिसतो आतील तळ
अड्वेल जर त्यास कोणी दुष्ट खळ, बंध तोडेल उधाण जळ

प्रेमातले असते गुपित खरे, फणसातील जणू गोड गरे
मनात कबुतर गोलगोल फिरे, हीर रांझा, नि प्रेमाचे झरे 

प्रेमात पसरते ती चंद्रप्रभा, झळाळून उठते मनास आभा
नसतो मनात सावता सुभा, सच्च्या प्रेमाचा सच्चा गाभा

प्रेमात हर्ष, प्रेमाचा स्पर्श, प्रेम जगवावे जिवंत प्रवाही
खरे प्रेम जे विटत नाही, उमलते फूल असं तुटत नाही
रचना: हेमंत केतकर 



 

Saturday, February 8, 2014

मुक्ताई

मुक्ताई
जीवन मुक्त असू दे गाथा
सदगुरूचरणी झुकू दे माथा
उंच जीवाची घेई भरारी
कैलासावर शिव त्रिपुरारी

बेहोशी मायेची नसावी
सोsहम चित्ती जाण वसावी
काळ वेळ हा जीवन मेवा 
ब्रह्म खुंटीला बांधून घ्यावा

षट शत्रूंचा सहज पिंजरा
मला न व्हावा कधी निवारा
निसर्ग माता माय भवानी
भय मेघांचे व्हावे पाणी

सुजनांची ती साथ मिळावी
मन बुद्धीचीहि जोड जुळावी
आरोग्याच्या सुगम संगती
आत्म वैभवी होवो क्रांती
रचना: हेमंत केतकर 


तिन्हीसांज


सांजवेळ गेली सरुनी
एकाकी मी नदीकिनारी

उन्हे उतरली झुके सावली
सळसळली हि झाडे वेली
तांबूस किरणे जळी उतरली
आसमंत हा मिठीत घेउनि

पाकोळ्यांचे नृत्य संपले
पाखरांचे थवे विखुरले
चतुरानी प्रतिबिंब चुम्बले
शांत सावळ्या पाण्यामधुनी

थकलो डोही खडे टाकुनी
सवे स्वतःशी शीळ घालूनी
बगळ्यांची चुकली जोडी
आकाशी झळाळत मौनी

संगीत घुमत रातकिड्यांचे
अंधारातून डोह दुमडले
थंडगार थरथरते वारे
शिरशिरले  माझ्या मनातुनी

चंद्रकोर ती दूर आकाशी
मंद वात ते मज न जाणवी
गाठून अवचित मज एकांती
अंधारातून रात्र गोठली
रचना: हेमंत केतकर 


मन आणि बुद्धी


मन आणि बुद्धी
जसे पक्षी आणि वृक्ष
मन वृक्षावरी बैसे
पक्षी आनंदाने डोले
मन उडाले उडाले
बुद्धी खिन्नतेने बोले
मन उडे भिर भिर
करे बुद्धी कीर कीर
पेटे उन्हाची ती झळ
मना वृक्ष हेच स्थळ
पक्षी वृक्षाचा हा मेळ
वृक्षी पक्षाचे ते घर
सजे सुक्या फांदीवर
आला सोसाट्याचा वारा
राहे मनाला न थारा
पक्षी उडाला उडाला
वृक्ष एकटा राहिला
गेले वादळ सरुनी
पक्षी विसावे फिरुनी
पक्षी वृक्षाचा हा खेळ
मन बुद्धीचाच मेळ
रचना: हेमंत केतकर

प्रतिबिंब


तू आणि मी, मी आणि तू
कोण कसे? कोण कुठे?
मी तू वाटे, तू मी वाटे
तरी दोघे वेगळे कसे?

मोजा एका हाताचा,
दुज्या हाती बसत नाही
केवढे साम्य,प्रचंड फरक
तुला स्वर्ग मला नरक

सकाळ तशीच सायंकाळ
नजारा तोच जवळपास
दिवसहि तोच, सुर्यहि तोच
पण उदय अस्त हीच खोच

आरशात परत आपलेच रूप
तंतोतंत तरी अंतर खूप
एक खरे, एक भ्रामक
अगदी सारखे तरी उलट
भाग्य आपले उलट पालट,उलट पालट!
रचना: हेमंत केतकर 

 
 

वर्तमान


कशासाठी खोदतो बेटा
भूतकाळातील थडगी
अंधारल्या मैदानावर
झोपलेली मडकी

अर्धे आयुष्य सरले तुझे
झेपावताना पुढे पुढे
अज्ञाताची वाट सारी
तरी तुझे मन का कुढे?

स्वार्थ ज्यांना प्रिय होता
त्यांचा त्यांनी साधला
तुझा तो हेतू नव्हता मुळी
म्हणून तू निघून गेलास

एक स्मशान टाकले मागे
हपापलेल्या भूतांचे
तरी मन का गजबजते?
आठवून त्यांचे हेवे दावे

अशी स्मशाने रोज तू
सरावाने पार केली
मार्गी तुझ्या नशिबाने
गुरु शक्ती साथीस आली

ती शक्ती सांगते तुला
मी ब्रह्म आहे
तुझा अहं विसरण्यासाठी
हा मायाजाल आहे

तुझाच जीव, तुझाच देव
साऱ्या जगात भरला आहे
वेली,झाडे,माणसे,प्राणी
यात तो व्यापला आहे

भूतकाळातील हवा ती
मनात साठे, तमात दाटे
गाभाऱ्यातील ज्योतीला
तिच्यापासून धोका वाटे

म्हणून म्हणतो बेटा तुला
नको खोदू जुनाट थडगी
अंधाऱ्या हवेस आत येण्या
उघडू नको आठवणींची खिडकी
रचना: हेमंत केतकर

जीवन असे ही!


अव्यक्त यातनांच्या दर्यात वाहताना
भंगुर त्या सुखांचे स्मृतीस्तंभ शोधताना
लाटा अनेक आल्या बदलून जात वाटा
हृदयात आस इतुकी केव्हा मिटेल गाथा?

निबिडश्या अरण्यी झाडे तमात बुडता
पहाऱ्यात काजव्यांच्या धुंदीत चंद्र बघता
जगण्यात मरण मरता आशा किती निमाल्या
स्वप्नात जन्म जगता हसण्यात अर्थ कुठला?
रचना: हेमंत केतकर

कोष


मीच माझा कोष बांधला
नाजूक धागा अचूक जुळवला
धागा विणता सारे जग
मदत हवी का मला पुसत

गुंफण्यात परी गुंता झाला
धागा धागा हरवून गेला
विचारावे म्हटले कुणातरी
अडकून पडलो अंतरी

हसत छद्मी बोलतो कुणी
धागा तुझा गुंता तुझा
मरून कुज वा कुजून मर
बरय आम्ही येतोय तर
रचना: हेमंत केतकर

मशरुम


पशिमेला रुपेरी कडानि न्हालेलं क्षितीज
आभाळाला ओढून जमिनीला भिडलेले
दिसते पण वास्तवात कधी नसतेच

स्मृतींनी भिजलेल्या ओल्या आठवणी
मनाच्या मशरूमला घट्ट बिलगतात
सत्याच्या नकाशावर मृगजळा सारख्या  
रचना: हेमंत केतकर

Thursday, February 6, 2014

घर कौलारू


खेड्यामधले घर कौलारू ऐकत होतो एक दिवस
ग.दि.मांच्या प्रतिभेला दाद देत होतो मान हलवत

तेवढ्यात आली आमची मुक्ता म्हणे बाबा तुम्हीही कराना कविता
फुकटची गाणी कुठली हो  ऐकता ओनरशिप फ्ल्याटवर करा कि  कविता

मी म्हटले ओ.के. बॉस! ओनरशिप फ्ल्याट आमचाच खास  
सिमेंटच्या भिंती, सिमेंटचे छत, वॉटर प्रूफिंगचा  छतावर थर

पायाखालती आहेत ग्लेझ्ड टाइल्ल्स, स्टेशन फक्त सिक्स माइल्ल्स!
भिंतीना आहेत कलर्ड वॉल पेपर्स, दिमाखदार आहे हा  टू रूम किचन

खिडक्यांवर आहे पेल मेटचा साज, मधून ऐकू येतो टिंग टोंग चा आवाज
भिंतीना आहे  स्कर्टइंग चा रुबाब, हवा नि उजेड यांना अगदी फ्री वाव

सनमायका फोर्मायका आहे फर्निचर, बाल्कनीत वारा गातो गाणे फ़र फ़र
असा ओनरशिप फ्ल्याट आहे डौलदार, किती व्हाईट किती ब्लैक विचारू नका

एवढे वर्णन ऐकून म्हणाल तुम्ही मला, स्वतःचा ब्लॉक मग काय बुवा
सुखात रहाता झोकात रहाता नशीबवान आहात, नशीबवान आहात
पण
पण खरी गोष्ट सांगू तुम्हाला?  करू नका बर कुठेच बोलबाला
एकच गोची बोचतेय मला, मी पार मुकलोय घर पणाला, कारण!

कारण या घरात नसतेच कुणी दिवसा, जरी रोज रात्र येते मुक्कामाला
मग घर आणि लॉज यात फरक काय? ट्याक्स भरताना मी मात्र झालो गरीब गाय

दिवसभर उजाड असलेला हा माझा ब्लॉक, याच्या भिंतीही पार निर्जीव होतात
माझ्या घामाघामातून उभारलेल्या साऱ्या वस्तू तरी मला त्या का परक्या वाटतात?

या घरात नाही माणसांचा आवाज, पावसात भिजतो पण दिसतो भकास
उजेडात न्हातो तरी भगभगताच प्रकाश, नातवाला कुठे इथे आजोबांचा ध्यास?

कौलारू घरासारखा नाहीच हा खास, कुठे दरवळतो इथे पारिजातकाचा सुवास?
रहाट्याच्या गाण्याऐवजी मोटारचा आवाज, निसर्गाची चाहूल नाही हरवलाय ऋतुराज

पूर्व दिशेला एक रस्ताही वाहतो, पण नुसताच वाहनांचा गोंगाट
कसा चढवू तुम्हीच सांगा कवितेला, ग.दि. मांसारखा प्रतिभेचा साज?
रचना: हेमंत केतकर



शोध- बोध


नैतिकतेच्या भ्रमरामागे वृथा धावलो आजवरी
कमल लोचने वाट पाहुनी  पहा थबकली दूरवरी

मर्यादेचे फास बांधुनी उगा डोललो झुल्यावरी
स्वप्नामधले पंख बांधुनी हृदय शोधते एक परी

लगाम लावूनी मनास माझा कशा थांबलो ऐलतीरी
तारुण्याची तृषा भागते वास्तवतेच्या  पैलतीरी

सावधतेच्या शालीमधुनी विरघळले क्षण पटावरी
निसर्गनिर्मित सहज शीलता दीर्घ उसासे तटावरी
रचना: हेमंत केतकर

Wednesday, February 5, 2014

प्रतीक्षा


स्वप्नात विहरली तू, भेटीस वाट बघुनी
नदीचा प्रवाह गाई वाऱ्यात सूर मिळूनी

सांभाळ त्या बटाना, लाजुनी मोर भिजला  
तो वृक्ष एक मोठा, सोबतीस मित्र तुजला

पारावरी उभी तू, जप तो खट्याळ वारा
भिडूनी खुशाल अंगा, उडवून देत पदरा

तो येत नाही अजुनी, हा प्रश्न एक तुजला
दाबून दात अधरी, पुसतेसहि तू स्वतःला

विसरुनी आज गेला? अपुल्याच आर्जवाला
खेळात दंग झाला? तो शाम सोबत्यांच्या?

क्षण एक फक्त तुजला, भासे प्रदीर्घ झाला
नजरेस भार वाढे, निरखूनी  त्या पथाला

मन मोहरून आले, त्याच्या स्मरूनी खोड्या
तो एकमेव राजा भिनभिनतो  हृदय  नाड्या

या रोजच्याच भेटी, तरी त्या हव्या हव्याशा
हितगुज रोजचे ते, परी गाठी नव्या नव्याशा
रचना: हेमंत केतकर

Tuesday, February 4, 2014

ओळख

ओळख
तू आली होतीस तेव्हा
आभाळ कोंडले होते
ढग गर्जत आले भवति
अन बरसत गेले पुढती.....

तू आली होतीस तेव्हा
वृक्षांची सळसळ हसली
बरसात टपोऱ्या थेंबांची
मृदगंधा उधळीत गेली.....

तू आली होतीस तेव्हा
क्षितिजाशी झुकला सुर्य
त्या कुंठीत नजरा पाठी
तू जाणत झेलीत आली.....

तू आली होतीस तेव्हा
एकांती गवसली सृष्ठी
विश्वास बसे ना माझा
तू विसावत माझ्या पुढती.....

तू आली होतीस तेव्हा
हृदयाला भरुनी नेत्री
तू शब्द बोलली काही
निःशब्द तंद्री निमाली ....

तू आली होतीस तेव्हा
श्वासांची जवळीक झाली
मज सर्व सर्व आठवते
ती आपुली ओळख ओली.....
रचना: हेमंत केतकर

अनुनय


ओजस्विनि तू सुहास्य वदने
कर कमलातून मार्दव गाते
नेत्र द्वय तव जीवन गंगा
अनुरक्त भेटली तू धीट पतंगा.....

दंत पंक्ती तव शुभ्रांगी ही
हास्य पसरता सांडत मोती
लाडिक अल्लड स्वर ओघळतो
सावर मजला मी हा बुडतो.....

कुंतल सुंदर भूमीस स्पर्शून
त्या कुंभाच्या आव्हानातून
ओष्टांगाचा स्पर्श थरारून
अमृत पिऊ या मिठीत बिलगून ......
 
सुगंध भरू दे, स्वप्न उमलू दे
अनंगरंगा दिशा खुलू दे
आज मला तू मुक्त होऊ दे,
आज मला तू रिक्त होऊ दे.....
रचना:हेमंत केतकर

वर्षा ऋतू


उदास होतीस उजाड होऊन
थकल्या सुकल्या नयना आडून
वृथा विनविशि खग राजाला
उत्सुक नभ हा तुझ्या मीलना
जलधारांनी तुझ्याकडे धावला, आला वर्षा ऋतू आला

तृप्त सोहळा तृप्त धरित्री
तृण पात्यांची हिरवळ प्याली
शत धारांनी भिजली माती
हळूच ओढते हिरवा शालू
बिलगुनी सरितेच्या काठा, आला वर्षा ऋतू आला

बरसून जाता भार ऋतूचा
भाग्यविधात्या रविराजाचा
भालप्रदेशी कुंकुम ल्याली   
नव निर्माणा सुसज्ज जाहली 
अल्लड नवरी धरणी माता, आला वर्षा ऋतू आला
रचना: हेमंत केतकर