Tuesday, January 28, 2014

जाग

जाग
उदासीनता आज पळाली आत्मवंचनेची
स्वत्व सुर्य हा मनी उगवला पहाट सोन्याची

तिमिराचे जरी स्वागत केले अंधार्या ढगांनी
मनी खिन्नता कशी पळविली गर्जत जलधारांनी

पिसाट वारा हसे विझवतो मिणमिणत्या ज्योती
खुल्या नभातून साथ मिळाली शत ताऱ्यांची व्याप्ती

निराश मार्गी चाल करारी उगाच का थकशी
काळोखाला उजळील आता रविकिरणांची दीप्ती

चंद्र सुर्य का समे तळपती एका नभांगणी
तेज - प्रीतीला वृथा बांधिशी हृदयाच्या कोंदणी

असंख्य पर्णे जरी गळली स्नेह भावनेची
वृक्षराज तव युगे बहरला फुले मोहराची

चंद्र विरसला, तारे विझले चाल शेवटाची
अंधारा भेदून उगवली  पहाट जन्माची
रचना: हेमंत केतकर  

Monday, January 27, 2014

शहाणपण

शहाणपण
चिमणा आणि चिमणीचे एकदा लागले लग्न
चिमणा होता रुबाबदार जवानीत मग्न

चिमणी होती शहाणी अन स्वभावाने नीट
एवढीशी चिमुकली परी मोठी धीट

चिमण्याच्या गळ्याभोवती होता काळा पट्टा
लग्नापूर्वी उडवत होता तो चिमणीची थट्टा

लग्नासाठी जमले सारे पक्षी पंख्यावरी
जोडा छान जमला म्हणत गेले आपल्या घरी

नंतर एकदा काय घडले?..........काय? काय? काय?

चिमणा चिमणीत भांडण झाले
कुणीच माघार घेईना....
तेव्हा पोपटराव जज्ज होऊन आले

मिठू बोले न्याय आपुला
काडीमोड ना मार्ग चांगला 
आपण काही मनुष्य नाही
घरट्यासाठी मोडा काडी
पिल्ले होतील गोजिरवाणी 
त्यांना उडता येण्यासाठी
लावा सारी जिद्द आपुली

मिठ्ठूचा हा न्याय ऐकुनी
पक्षी सारे मान डोलवी
चिमणा चिमणी समजून सारे
घरी परतली आनंदानी

चिमणी म्हणाली चिमण्याला
मी तर बाई वेडी कशी!
तुम्हास सोडून, दुसरा जोडून
पटेल त्याचे कशावरून?

चिमणा बोले हलवून मान
म्हणे आपुली जोडी छान
काड्या मोडून करू महाल
पटेल केव्हा माणसास ह्या...
त्याच्या पेक्षा पक्षी महान!
त्याच्या  पेक्षा पक्षी महान! .... हा हा हा.....
रचना: हेमंत केतकर

Monday, January 20, 2014

माणसं


भोवती फेर धरून  बांधणारी
गर्दीत गुदमरुन टाकणारी
गोंगाटात बहिरं करणारी
माझ्यातील मी विरजणारी
माणसं
तिरकस फुत्कार सोडणारी
प्रेमात हात पाय गुंतवणारी
जाळ्यात ओढून अडकवणारी
माझा वेगळेपण जाळणारी
माणसं
सत्तेने गळा आवळणारी
सत्त्याच्या शोधात छळणारी
स्वार्थासाठी वाभाडे काढणारी
माझे अस्तित्व पुसणारी
माणसं
रचना: हेमंत केतकर

झुंज


जिंकलो मी हारलो मी
द्वन्द्व समरी झुंजलो

स्वप्न रंगी रंगलो मी
वास्तवातुनी रखडलो

गुंतलो मी हरपलो मी
तत्व युद्धी भंगलो

मुल्य माझे झीझंउनी मी
एक शुन्य राहिलो

सोंग माझे मीच केले
 तू न जरी ते भेदिले

शुद्धतेला जाळूनी मी
तव विषाला पचविले

हासलो मी क्रन्दलो मी
शब्द शरांनी विन्धिलो

तव निखारे कोंदणी मम
अधिक शुद्ध उजळलो
रचना: हेमंत केतकर



सावली


होता अतूट वेडा मन संगमा वरी किनारा
का जाळलास तो तर ठेउनी हा निखारा 
सहवास तो सुखाचा, विश्वासलो मी सारा
आभास सोबतीचा तू सांभाळला उरीला

विझवून शुध्द ज्योती मिळूनी लाविलेल्या
मज दूर लोटिले का त्या निर्दयी क्षणाला
रागास सांग इतुका अपराध काय झाला?
का आत्मक्लेश योगे तव बुद्धी भेद झाला

जरी वाटलो मी तुजला हृदयी हवाहवासा
बिलगून स्वच्छ ढोंगा इन्कार का तू केला?
विश्वासुनी कुणा त्या भलत्याच कल्पनांना
वदुनि मला नकोसा या पुसलेस सावलीला
हेमंत केतकर 

Sunday, January 19, 2014

न्याय

न्याय
न्याय न्याय का वृथा आवई
निबर जाहला तू क्रूर कसाई
कुणी भेटताच सशक्त सवाई
आपटतो का कुणा लक्षुनी भुई? न्याय कधी का कुणा मिळाला?

न्याय तुला जर हवाच असला
एकवार बघ आपुल्या जन्मा
तुला जन्म का मातेस वेदना
न्याय कधी का कुणा मिळाला?

न्याय तुला जर हवाच असला
एकवार बघ दीन भिकाऱ्या
दोघे मानव कशी भिन्नता
न्याय कधी का कुणा मिळाला?

न्याय तुला जर हवाच असला
एकवार बघ गायीस आपुल्या
तुला दुध का गवत वासरा?
न्याय कधी का कुणा मिळाला?

न्याय तुला जर हवाच असला
एकवार निरख तू घोडा गाड्या
लगाम तुजशी चाबूक घोड्या
न्याय कधी का कुणा मिळाला?
हेमंत केतकर





 

विद्रोही


देव असती जगात, देव जनात मनात
देव होतेच जगात,परी त्यांच्यातही तट

होते देवांचेही गट, भय देवांचे जगात
कर एकासी जवळी, हेवा दुज्या देवा भाळी

देव माणसासी तारी, देव माणसासी मारी
देवादिकांचेहि किल्ले, प्रत्येकाचे वार दिन

देव देवतांची राज्ये, त्यात झालो आम्ही धन्य
देव मानवाचा मान, देव तुमचे इमान

तुम्ही पेटविल्या ज्योती,मग देव झाल्या ज्योती
देव दानवांचे बळी, देव दानवांची भीती

का डरतोस वेड्या, कोणी निर्मिली त्रिमिती
बघ आरपार चित्ती, देव तुझीच निर्मिती, देव तुझीच निर्मिती
रचना:हेमंत केतकर

कल्पवृक्ष




स्वप्नील कल्पवृक्षा, बघतो तुला कितीदा
छायेत दाट तुझिया देशील का विसावा ?

किती रुक्ष हा उन्हाळा, शोधू कुठे निवारा?
मन आर्त साद देते तव स्थित प्रज्ञतेला

हिरवे तुझे सुपर्ण, वरुनी निळे आभाळ
छायेत तेज दाटे, लपवित सूर्यकिरण

फुललास तू नि हसला, हलके सुगंधी वारा
क्षण एक तुजसी बघता संजीवन ये मनाला

रचना: हेमंत केतकर

शिव आराधना




जय जय शंकर उमानाथ
जय श्री गजाननाचा तात
षडानन पुत्र तेजःपुंज
स्मरणी आनंद निरंतन ||१||

मासांमध्ये श्रावण मास
रुद्र घोष शिव हर हर
शिवरात्र,सोमवार, प्रदोष
स्मरावा  शंभू श्री महादेव ||२||

हिमनग कन्या जी  पार्वती
जगदंबिका शिव अर्धांगिनी
उमा महेश्वराची पुनीत जोडी
जपावी ठेऊन मनात गोडी ||३||

माथी उसळत गंगा नीर
जटेत विलसे चंद्रकोर
तृतीय नेत्री वैश्वानर
पार्वतीचा पती पंचानन ||४||

गळ्यात सर्प माळा विलसे
कटीस व्याघ्राम्बर नेसलासे
रुद्र अहंकारे व्यापलासे
अभयंकर महाजोगी ||५||

भोळा सांब सदाशिव
भक्त रक्षणा घेतो धाव
प्रसन्न होता देतो अगणित 
पुरे म्हणता होईल मात ||६||

भावाचा भुकेला सदाशिव
भक्तांना पावतो तात्काळ
धनिक निष्कांचन जात पात
समसमान नाथ सर्वांचा ||७||

ध्यानात सदा रममाण
वैराग्यात अखंड मग्न
नाथ पन्था मार्ग प्रदीप
अद्य गुरु कैलासपती ||८||

हे शिवशंकर त्रिपुरांतक
लिंगात्म्की  सदैव वास
पूजितो तव शिवलिंगास
कृपाशीर्वाद मज द्यावा ||९||

काय वाचा मने करून
हस्त पाद दृष्टी करून
जाण अजाण जाहले अपराध
क्षमावे हे करुणाकरा ||१०||    
रचना: हेमंत केतकर

निजबोध




नेशी साधकांच्या देशी
जेथे आत्मानंद राशी
जीव शिवाची जी काशी
लाभे आनंदाच्या राशी.....

जीव येथे कंटाळला
काला त्रिगुणांचा झाला
दर्प येई अमृताला
शोध तुझा तू देवाला......

देव बैसला अंतरी
किती आवरणे हि वरी
माझा आतला गाभारा
होता अज्ञात राहिला......

परी आता तो लाभला
जणू सखा माझा झाला
बाह्य शरीराचा प्याला
आत अमृताचा झरा.....
रचना: हेमंत केतकर

कवी आणि कविता




बिंबातून  प्रतिबिंब रंगले
अव्यक्तातून व्यक्त बहरले
कविजनांनी हृदय ओतले
इंद्रधनू काव्यात उमटले.......

शब्द सागरी रत्न हुडकता         
पाऊल वाटा नव्या तुडवता
त्या वाटांचा रमणीय नकाशा
काव्यातून जो उलगडलेला .......

कवी कल्पनि चित्र रेखितो
शब्द रथा वा धरू पाहतो
कधी गुंफतो जीवन वास्तव
प्रतीबिंबानी जरी ते नश्वर ........

"तू बिंब" कवीला कुणी म्हणाले
कवितेला प्रतिबिंब बोलले
किरणानी  न्हाऊन उजळले
रसिक जनांचे अथांग मेळे .........
रचना: हेमंत केतकर

आत्मोपदेश




शांत हो स्वस्थ हो, अंतरी न भ्रष्ट हो

दक्ष हो सुस्पष्ट हो, अंतरी न कष्ट हो 

मुक्त हो स्वतंत्र हो, अंतरी निर्बंध हो ........

सप्रेम  हो क्षेम हो, अंतरी न दुष्ट हो 

देय हो गेय हो, अंतरी निश्रेय हो ...........

शस्त्र हो धर्म हो, अंतरी न गर्व हो 

मंत्र हो तंत्र हो, अंतरी न वर्म हो 

दिप्त हो तृप्त हो, अंतरी उदात्त हो ............

सिद्ध हो स्वरूप हो, अंतरी न त्रस्त हो 

सत्य हो तीर्थ हो, अंतरी न ग्रस्त हो 

भक्त हो अनंत हो, अंतरी कृतार्थ हो ............

गंध हो स्पंद हो, अंतरी न धुंद हो 

सुप्त हो गुप्त हो, अंतरी न मंद हो 

ध्येय हो श्रेय हो, अंतरी उन्मुक्त हो .........

रचना: हेमंत केतकर