Sunday, January 19, 2014

शिव आराधना




जय जय शंकर उमानाथ
जय श्री गजाननाचा तात
षडानन पुत्र तेजःपुंज
स्मरणी आनंद निरंतन ||१||

मासांमध्ये श्रावण मास
रुद्र घोष शिव हर हर
शिवरात्र,सोमवार, प्रदोष
स्मरावा  शंभू श्री महादेव ||२||

हिमनग कन्या जी  पार्वती
जगदंबिका शिव अर्धांगिनी
उमा महेश्वराची पुनीत जोडी
जपावी ठेऊन मनात गोडी ||३||

माथी उसळत गंगा नीर
जटेत विलसे चंद्रकोर
तृतीय नेत्री वैश्वानर
पार्वतीचा पती पंचानन ||४||

गळ्यात सर्प माळा विलसे
कटीस व्याघ्राम्बर नेसलासे
रुद्र अहंकारे व्यापलासे
अभयंकर महाजोगी ||५||

भोळा सांब सदाशिव
भक्त रक्षणा घेतो धाव
प्रसन्न होता देतो अगणित 
पुरे म्हणता होईल मात ||६||

भावाचा भुकेला सदाशिव
भक्तांना पावतो तात्काळ
धनिक निष्कांचन जात पात
समसमान नाथ सर्वांचा ||७||

ध्यानात सदा रममाण
वैराग्यात अखंड मग्न
नाथ पन्था मार्ग प्रदीप
अद्य गुरु कैलासपती ||८||

हे शिवशंकर त्रिपुरांतक
लिंगात्म्की  सदैव वास
पूजितो तव शिवलिंगास
कृपाशीर्वाद मज द्यावा ||९||

काय वाचा मने करून
हस्त पाद दृष्टी करून
जाण अजाण जाहले अपराध
क्षमावे हे करुणाकरा ||१०||    
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment