Tuesday, January 14, 2014

स्वागत करू या नववर्षाचे


सरले सांप्रत वर्ष दिवाणे
सुटले किचकट प्रश्न पुराणे
दोन सहस्त्र चौदावे नावे
हर्षभरित हे गाणे गावे, उमलून आले वर्ष नवे

लेखा जोखा मागील झाला
जुन्या चुकांचा हिशेब केला
नको तीच ती पुनरावृत्ती
सुधारून घे नव आवृत्ती, उमलून आले वर्ष नवे

मनास फिरुनी स्पंद नवे
नवीन आशा, संकल्प सवे
नव्या उमेदी, नवी भावना
छटा रुपेरी नव्या कल्पना, उमलून आले वर्ष नवे

काळ चालला पुढती पुढती
मोद भरावा अवती भवति
दुखणारे क्षण विसरून जावे
अमृत कुंभा उचलून घ्यावे, उमलून आले वर्ष नवे

चला वाजवू एक तुतारी
यशा गवसण्या घेऊ भरारी
जगा दाखवू क्षमता सारी
देशभक्ती हि आमुची न्यारी,उमलून आले वर्ष नवे

नववर्षाचे ताजे नव क्षण
उन्मेषाने वेचू कण कण
स्वागतास तव आम्ही पुढे
इथे तिथे, अन चोहीकडे, उमलून आले वर्ष नवे
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment