Thursday, January 16, 2014

सरी वर सरी


आल्या पावसाच्या सरी, दिशा साऱ्या अंधारल्या,
होता डोंगर मुकाट, आणि अबोलही दऱ्या |

वारा घोंघावत आला,पाठी मेघांची वरात,
वृक्ष लतानी मांडला, सुक्या पाचोळ्याचा ओघ |

वन गावातील वाटा, धूळ उडवीत गेल्या,
गायी गुरांचा कळप, चोहीकडे विखुरला |

आली दणाणत आली, मोठ्या विजेची ती हाळी,
भल्या टपोऱ्या थेंबांची, मोठी लयलूट झाली |

सरी वर सरी, किती उधळण झाली,
गच्च भिजल्या अंगांनी, सारी मने ओसंडली |

गाणे थेंबानी मांडले, घरे वाहती पागोळ्या,
पाणी प्यायले मातीने, काही सांडत काठाला |

थेंब मिळत पाण्याला, त्यचे ओढे नाले झाले,
नदी भरल्या अंगांनी, पाणी फेसाळत गेले |

झाला आसमंत शांत, सृष्टी अवघी निमाली,
सारी आनंदाची उर्मी, जीव मोहरून गेली |

या गीतांच्या लकेरी, सूर तालांच्या संगमी,
दान शब्दांचे घेऊन,आल्या पावसाच्या सरी |
रचना: हेमंत केतकर

No comments:

Post a Comment